दिल्लीच्या धर्तीवर लॉकडावुन लागण्याची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार लवकरच घोषणा.

आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क–
मुंबई/ वृत्तसेवा
            राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आता लॉकडाऊन लागणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाल्याचे अनेक मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, पुढील 15 दिवसांसाठी लॉकडाऊन असू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील.

 आता  लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही – राजेश टोपे 
           मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत घोषणा करतील.

कडक लॉकडाऊन हवा-एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, 'राज्यात लॉकडाऊन लावला, तर तो अत्यंत कडक असला पाहिजे. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील', असे शिंदे यांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन - अस्लम शेख
यावेळी मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख म्हणाले की, राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल.

सकाळी 7-11 या वेळेतच सुरू राहतील अत्यावश्यक सेवा

राज्यातील कोरोना परिस्थिती ही गंभीर होत असताना दिसत आहे. दरम्यान आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकाने, दूध, भाजीपाला दुकानांमध्ये गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सरकारने या दुकानांची वेळ कमी केली आहे. या नियमानुसार आता अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान आणि इतर दुकाना या सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. राज्य सरकारने याविषयी एक अध्यादेश जारी केला आहे.

'राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.' असे सरकारने आपल्या अध्यादेशात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, दारुची दुकाने, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, शिकवणी किंवा ट्यूशन पूर्णपणे बंद राहणार आहेत.

0/Post a Comment/Comments