*ऐनपूर येथील महिला मजूरवर्गाच्या मागणीला यश*
आवाज परिवर्तनाचा वृत्त–
ऐनपूर ता. रावेर (प्रतिनिधि) – येथील महिला मजूरवर्ग गेल्या अनेक वर्षांपासून निंदणे, पील कापणे, मट्रेल सोडणे, नळ्या ठोकणे, नळ्या अंथरणे, मकई मोडणे व वाहणे यांसारखे नानाविध प्रकारचे शेतीकाम करीत असतात. परंतु त्यांना रोजंदारी म्हणून दिवसाला १००/- रु. मिळत होते. परंतु सध्याच्या कोरोना या विषानुजन्य महामारीमुळे आणि सततच्या लॉकडाऊनमुळे आधीच काम मिळणे कठीण झाले आहे आणि त्यामध्ये १००/- रु. मध्ये संपूर्ण घर चालविणे म्हणजे अशक्य होते. त्यासाठी सदर महिला मजूरवर्गाने आवाज परिवर्तनाचा या साप्ताहिकाचे ऐनपूर येथील प्रतिनिधी चेतन भालेराव यांच्या सहाय्याने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच श्री. अमोल प्रभाकर महाजन यांचेकडे रोजंदारी वाढून मिळणेसाठी निवेदन सादर केले होते. त्याचा विचार करून काही शेतकऱ्यांनी तात्काळ समजूतदारपणाची आणि माणुसकीची भूमिका घेत महिला मजूर वर्गाला वरील सर्व कामांसाठी १५०/- प्रती रोजंदारी देण्याची मागणी मान्य केली. या निर्णयामुळे महिला मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे. तसेच आवाज परिवर्तनाचा या साप्ताहिकाचे ऐनपूर येथील प्रतिनिधी चेतन भालेराव यांनी ऐनपूर गावाचे सरपंच श्री. अमोल महाजन यांचे सोबत जास्तीत जास्त महिला मजूर वर्गाला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मार्फत रोजगार उपलब्ध करून देणे संदर्भात चर्चा केली असता श्री. अमोल महाजन यांनी यावर मा. ग्रामविकास अधिकारी, रोजगार सेवक आणि ग्राम पंचायत सदस्य यांचे सोबत प्राधान्यक्रमाणे चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल आणि लवकरात लवकर महिला मजूर वर्गाला, आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
Post a Comment