आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क:
पुणे : भारतातील आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्रोत असणाऱ्या भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला यंदाच्या पावसामुळे क्षती पोहोचलेली आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे विजय स्तंभाला फुगवटा आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी अघटीत अशी घटना घडू शकते. त्यामुळे राज्य सरकारने विजयस्तंभाची अत्यंत तातडीने दुरुस्ती करावी या मुख्य मागणीसह तसेच इतरही काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन भीमा कोरेगाव येथे 11 सप्टेंबर पासून सन्मान मार्च काढण्यात येणार आहे. हा सन्मान मार्च मंत्रालयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर काढण्यात येणार आहे. अशी माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवासंघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली. यावेळी निलेश गायकवाड, दिपांकर इंगोले, विशाल सोनवणे उपस्थित होते.
विजयस्तंभ सेवा समितीच्या प्रमुख मागण्या
1) विजयस्तंभावर मागील 11 वर्षांपूर्वी वीज कोसळली होती, यामध्ये विजयस्तंभाच्या वरील भाग कोसळला होता. त्यावेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु दुरुस्ती अयोग्य पद्धतीने केल्यामुळे त्याच जागेवरून विजय स्तंभाच्या वरील भागातून स्तंभाच्या आत पाणी मुरत आहे. परिणामी विजय स्तंभाला क्षती पोहोचत आहे.
2) एक जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेली दंगल व 3 जानेवारी 2018 रोजी भारत बंदच्या दरम्यान जवळपास 30,000 कार्यकर्त्यावरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा शब्द देऊनही अद्याप पर्यंत गुन्हे मागे झालेले नाही. ते त्वरित मागे घेण्यात यावे.
3) विजयस्तंभाच्या विकास कामासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, व स्तंभाच्या शेजारील खाजगी जमीन अधिग्रहित करण्यात यावी.
या प्रमुख मागण्यासह अजून चार विविध मागण्या सेवा संघ समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. याच्या पूर्ततेसाठी उद्यापासून भीमा कोरेगाव ते मंत्रालय असा सन्मान मार्च काढण्यात येणार आहे. या सन्मान मार्चमध्ये सामील होण्यासाठी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment