डॉ .बाबासाहेब आंबेडकर लिखीत "भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म" म्हणजे मानवी कल्याणाचा मार्ग होय - अहिरे गुरुजी

             अतुल्य वर्षावास.०४
               प.पु.डॉ .बाबासाहेब आंबेडकर लिखीत "भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म" म्हणजे मानवी कल्याणाचा मार्ग होय.
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा प्रतिनिधी -



                  कपिलवस्तू  येथील शाक्यांच्या शासनपद्धती विषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला "राजा" अशी संज्ञा होती. शाक्यांच्या राजधानीचे नाव "कपिलवस्तू" हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिलमुनी यांच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूंमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिनहु( सिंहहनु) नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनुचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुध्दोदन,धौतोदन,शुक्लोदन शाक्योदन व अमितोदन असे पाच पुत्र होते.या पाच पुत्राशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता नावाच्या दोन कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुध्दोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. शुद्धोदनाने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली होती. ती महामायेची वडील बहिण होती.शुध्दोदन फार श्रीमंत होता. तो ऐषारामात  राहात होता. त्याचे अनेक महाल होते.
               
              सिध्दार्थ गौतमाच्या जन्माचा भाग संस्मरणीय आहे.शाक्य लोकांत प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची पध्दत होती.हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पध्दत होती.एकदा महामायेने हा उत्सव थाटामाटात साजरा करण्याचे ठरविले.उत्सवाच्या सातव्या दिवशी सकाळी लवकर उठून महामायेने सुगंधी द्रव्याने आंघोळ करुन दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा दान केल्या. साजशृंगार करुन आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात गेली. त्या रात्री शुध्दोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला.ती आषाढ पौर्णिमा होती.महामायेला निद्राधीन असता एक स्वप्न पडले. स्वप्नात तिचा पलंग चार जणांनी उचलून एका विशाल शाल वृक्षाखाली नेवून ठेवला व ते बाजूला उभे राहिले आहे.नंतर त्या चतुर्दिक्पालांच्या स्रियांनी येवून मानससरोवरात आंघोळ घालुन सुगंधी द्रव लावून फुलांनी तिला असे सजविले की ती कुण्या दिव्यशक्तीचे स्वागत करु शकेल.तेंव्हा "सुमेध"नावाचा एक बोधीसत्व तिच्या पुढे आला व तिला प्रश्न केला " मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे .तू माझी माता होण्यास कबूल होशील का?" तिने उत्तर दिले,"मोठ्या आनंदाने" त्याच क्षणी महामायेला जाग आली...(क्रमशः) 
       संकलन - सुमंगल तथा रविंद्र अहिरे.

0/Post a Comment/Comments