बुध्द आणि त्यांचा धम्म यात रुची निर्माण होण्याचा प्रारंभबिंदू.

            अतुल्य वर्षावास ०२ 
बुध्द आणि त्यांचा धम्म यात रुची निर्माण होण्याचा प्रारंभबिंदू..
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क 
सावदा ( प्रतिनिधी ):
                         डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझे वडील लष्करी अधिकारी होते. पण त्याचवेळी ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. मला त्यांनी कडक शिस्तीत वाढविले होते. लहानपणापासूनच मला माझ्या वडिलांच्या धर्माचरणात काही अंतर्विरोध जाणवत असत. त्यांचे वडील रामानंदी असले तरी ते स्वतः कबीरपंथी होते. त्यामुळे मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता आणि तरीही ते गणपतीची पूजा करत असत. ते ती पूजा आमच्या खातर करत असले तरी ती मला आवडत नसे. ते त्यांच्या पुस्तक पंथाची पुस्तके वाचत असत,पण त्याचवेळी ते माझ्यावर आणि माझ्या मोठ्या भावावर रोज रात्री झोपण्यापूर्वी महाभारत आणि रामायण ग्रंथातील काही भाग माझ्या बहिणीसाठी आणि कथा ऐकायला वडिलांच्या अंगणात गोळा झालेल्या लोकांसाठी वाचून दाखवायची सक्ती करत असत. हा प्रकार बरेच वर्ष सुरू होता. 
                 ज्या वर्षी मी इंग्रजी चौथीची परीक्षा पास झालो तेव्हा माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा भरून तो प्रसंग साजरा करण्याची माझ्या समाजातील लोकांची इच्छा होती. तुलनेने इतर समाजातील शिक्षणाची परिस्थिती पाहाता हा काही तसा खास साजरा करण्याइतपत मोठा प्रसंग नव्हता. पण संयोजकाचे असे म्हणणे होते की, मी माझ्या समाजात या टप्प्यापर्यंत पोहोचलेला पहिलाच असल्यामुळे मी खूप उंचीवर पोचलो आहे असे त्यांना वाटते. ते परवानगी मागण्यासाठी माझ्या वडिलांकडे गेले.माझ्या वडिलांनी साफ नकार दिला. त्यांचे म्हणणे असे होते की, असे काही केल्यास ते माझ्या डोक्यात जाईल. " त्याने फक्त परीक्षाच उत्तीर्ण केली आहे त्यापेक्षा फार काही केलेले नाही." ज्यांना तो प्रसंग साजरा करावयाचा होता त्यांचा खूप हिरमोड झाला.पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत .ते दादा केळूस्करांकडे गेले, त्यांना पटले. थोडे समजावल्यावर माझ्या वडिलांनी मान्य केलं आणि सभेचा तो कार्यक्रम पार पडला.दादा केळूसकर अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या काळातील ते सुप्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या शेवटी मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धाच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत दिली. ते पुस्तक त्यांनी बडोदा सयाजीराव ओरिएंटल मालिकेसाठी लिहिलेले होते.मी ते पुस्तक अत्यंत लक्ष लावून वाचले आणि कमालीचा प्रभावित झालो.गलबलून गेलो.
                      माझ्या बाबांनी मला बौद्ध वाङमयांचा परिचय का करून दिला नसावा असा प्रश्न मला वारंवार पडू लागला. मी त्यांनाच हा प्रश्न विचारण्याचा निर्धार केला. एक दिवस विचारलेच. मी माझ्या बाबांना म्हणालो की, महाभारतात आणि रामायणात सगळीकडे फक्त ब्राह्मणांच्या व क्षत्रियांच्या मोठेपणाच्या तर शूद्रांच्या व अस्पृश्यांच्या अधःपतनाच्याच्या गोष्टीच खच्चून भरलेल्या आहे. तरीसुद्धा आम्हाला ती पुस्तके वाचण्याची सक्ती त्यांनी आमच्यावर का म्हणून केली? माझ्या बाबांना हा प्रश्‍न आवडला नाही. ते फक्त एवढेच म्हणाले! "असले मूर्खपणाचे प्रश्न विचारात जाऊ नयेत. अजून तुम्ही लहान मुले आहात,फक्त जसे सांगण्यात येईल तसे तुम्ही करावयाचे." माझे वडील तसे "रोमन पॕट्रिआर्क" होते आणि आपल्या मुलांवर त्यांचा व्यापक "पॕट्रिया प्रोटेस्टास" अधिकार चालत होता.मीच एकटा त्याच्याशी मुभा घेऊ शकत होतो आणि ते सुध्दा केवळ अशासाठी की मी लहानअसतानांच माझी आई वारली होती आणि आत्याने माझे संगोपन केले होते...[अपूर्ण ] 
संकलनः- सुमंगल तथा रविंद्र अहिरे 
                        (गुरुजी )

0/Post a Comment/Comments